तालुक्यातील ढोरेगाव येथील उर्दू शाळा परिसरात रविवारी (दि. १२) सायंकाळी ७ वाजता सुरू झालेल्या दोन दिवसीय तब्लिगी इज्तेमाचा आज (सोमवार) सायंकाळी सामूहिक दुवाने समारोप होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमात तालुक्यासह जिल्हाभरातून हजारो भाविक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इज्तेमासाठी मागील पाच दिवसांपासून नियोजन आणि तयारी सुरू होती. ढोरेगाव, नंद्राबाद, पेंडापूर, लिंबेजळगाव, तुर्काबाद, सोलेगाव, पुरी, प्रातपूरवाडी, वाळूज, शेंदुरवाडा, सावखेडा आदी गावांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
इज्तेमा कमिटीने कार्यक्रमाचे सर्व नियोजन काटेकोरपणे केले असून भाविकांसाठी राहण्याची, जेवणाची, आंघोळीची तसेच पाण्याची सोय करण्यात आली आहे. परिसरात वजूखाने, शौचालये, बाथरूम व पाण्याच्या लाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
धार्मिक कार्यक्रमासाठी पोलिसांचा बंदोबस्त :
या धार्मिक कार्यक्रमासाठी गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रवीण नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या नेतृत्वाखाली योग्य ती पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पाडून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राठोड यांनी केले आहे.